...
तर तुला डोळ्यात काजळ घालत असलेला मी कल्पित बसलो होतो. तुझा ब्लॅक ऍंड व्हाईट चेहरा आरशात मी पाठीमागून निरखत बसलो होतो. तू शर्ट वगरे काहीही न घालता आरशासमोर किंचित झुकलाच होतास. पाच दहा मिनिटं ते सगळे चाळे केल्यावर ढगळ कुठलातरी शर्ट घालून नी जीन्स चढवून तू माझ्याकडे यायला निघालास. तुझा सगळा प्रवास मी कल्पिला. सकाळची एकूण धीमी शांतता मी तुझ्या कन्टेक्स्ट मध्ये कल्पिली. तू कुठलं डीओ मारलं असशील ते कल्पिलं. तुझे ब्रॅंडेड बूट वगरेही.
मी दार उघडलं तेंव्हा तू चक्क भिजलेला होतास. हा पाऊस तर माझ्या कल्पनेत पडला नव्हता. पण तुझे कपडे तर तेच होते. डीओचा वासही तोच होता. बूट भिजलेले दिसत होते. तू हसलास. मी म्हटलं, हे कसं शक्य आहे?
तू म्हणालास, काय? मी म्हटलं, इथपर्यंत तर सगळं माझ्या मनातल्यासारख घडत होतं. आता मला डिसकनेक्ट झाल्यासारखं वाटतंय. तेंव्हा तू अनोळखी हसलास.
मग मी कापसाचा बोळा घेऊन तुझ्या गालावर ओघळलेलं काजळ पुसलं. टॉवेलने तुझे काटेरी केस पुसले. तुला पूर्ण उघडा करून स्वच्छ टिपून काढलं. तुला एक सिगरेट पेटवून दिली आणि आत चहा करायला गेलो .
बाहेर कप घेऊन आलो तेंव्हा तू म्हणालास, आता शांतपणे बस. खूप विचार केलास. मग माझ्या खांद्यावर हात टाकून बसलास. मीही टिपॉयवर सुखावून पाय सैल सोडले. तू म्हणालास कुठल्यातरी कविता म्हण. मग तीन चार तुला न कळणाऱ्या भाषेतल्या कविता म्हटल्यावर तू खुश झालास आणि वेडवाकडं कुठलंतरी मला न कळणारं बंगाली गाणं गायलास. तेंव्हा मी कॉम्प्लिमेंट म्हणून माझ्या पायाच्या नखांनी तुझ्या पोटऱ्या खाजवल्या. त्यावर तू मनापासून हसलास. असं किती वेळ?
शेवटी हसून खिदळून मी दमल्याची पूर्ण खात्री झाल्यावर तू म्हणालास, ती गेलीये हे आता मान्य कर. तुझ्या आसपास कुणीच नाहीये हे मान्य कर. तुझं पुरुष असणं फार सुंदर आहे. तुझ्या माझ्यातली समान गोष्ट हीच आहे की तुझ्या माझ्यातला फिमेल पार्ट बराचसा शमून गेलाय. तू आणि मी नुसते नुसते पुरुष राहिलोय. हे नवे नियम समजून घेता येतात का पहा. तुला तुझ्या आत हळवं काही वाटतं असेल तर ते बायकी हळवेपण नसून पुरुषी हळवेपण आहे, हे लक्षात येतंय का पहा. नुसत्या नुसत्या पुरूषांच्याही प्रेमात पडून पहा. तेही तितकंच सुंदर आहे. अजूनतरी अनटच्ड आहे.
नेमकी त्या क्षणी माझ्या डोळ्यात प्रचंड झोप होती आणि तुझं ऐकता ऐकता सोफ्यात माझं स्कल्पचर होऊन गेलं होतं.
-१०-४-१२.
No comments:
Post a Comment