डोक्यात एक मोनोटोनस कूं कूं आणि
घशात कॉफीचा चिकट गोडपणा घेऊन
मी निव्वळ झोपायचा प्रयत्न करतो एसीत सुस्तावलेल्या
हनुवटीवर डाव्या गालावर उजव्या कानावर
आणि कंटाळून टेबलाच्या कडेवर कपाळ वगरे तोलून.
टेबलाच्या विस्तीर्ण पृष्ठभागावरून निरर्थक डोळे फिरवत
कॉफीच्या कपाला चिकटलेलं माझंच मन बघतो
एखाद्या किटकासारखं
आणि त्यापलीकडून वैतागून माझ्याकडे पाहणाऱ्या मैत्रिणीला.
माझ्या अनुत्सुक मैत्रिणीला.
तिच्या डोळ्यातली कॉफीची जळजळ शिसारी आणते मला.
आणि माझ्या डोळ्यातली तिला.
कॉफीच्या सुखवस्तू मशीन सारखाच आमच्यात सुखवस्तू कंटाळा कोसळतो सर्व शक्तीनिशी
आणि मी दोन्ही हातांनी दाबून धरतो डोकं फोडून बाहेर येणारा
त्याचा अल्ट्रासॉनिक अतिविशिष्ट टुंग टुंग दा सौंड.
-१०-५-२०१२
No comments:
Post a Comment