disable right click

Thursday, January 31, 2013

संध्याभयाचे देणे

संध्याभयाचे देणे काय असावे आपल्याला? आकांताच्या संध्याकालीन दुर्बोध गर्भात सृजनाचे निर्मळ प्रवाह सोडून द्यावेत आपण फक्त. आकांताच्या अशा संध्येने मुद्दामहून शृंगारलेल्या गर्भात रुजणार तरी काय? तेही अशा वेळी. स्वतःच्या पडछायेचीही भीती वाटू लागलेली असताना. हेच या संध्याभयाचे देणे आहे आपल्याला. आपण आपलीच छाया निरखीत असताना आत्मज्ञानाचा, सृजनाचा, मुक्ततेचा एखादा दुर्बोध क्षण आपल्या वाट्याला यावा; त्याने आपल्या देहजाणीवेचा हर तर्हेने ताबा घ्यावा; आणि देहातीत, कालातीत अनुभूतीचे, सृजनाचे दान आपल्या मलूल पदरात टाकावे- असे काहीतरी घडावे फक्त या क्षणाला.

संध्याकाळी बळ एकवटण्याची घाईच जीव घेते. समागमाची भीती मनात दाटून येते. एखाद्या असंस्कृत हल्ल्याची भीती मनात दाटून येते. स्वतःचीच भीती वाटू लागते. इच्छांचा तळ सापडत नाही. विकार वासना निश्चयाने फुलत नाहीत. निश्चयाने बहरत नाहीत. भवतालाचे संदर्भ जाणीवेला उमगत नाहीत. मृत्युवत वाटते. संध्या एखाद्या एकाकी कुलीन पण दुर्भागी विधवेप्रमाणे दारावरून निघून जात असल्याचा भास होतो. तिला पुढे होऊन अडवावेसे वाटते. तिचा हात हातात घ्यावासा वाटतो. पण पायांना बळ पुरत नाही. हा संध्याभयाने विस्कटलेला मनाचा पसारा स्मृतींचे सगळे संदर्भ खुडून घेतो. अस्तित्वाचे सगळे संदर्भ खुडून घेतो. मनाचे देहाशी असलेले सगळे दोर निर्दयीपणे कापून टाकतो. अशा देहाचे स्वतःचे काही उरत  नाही. अशा मनाचे स्वतःचे काही उरत नाही.

पश्चिमेला एक बिंदू दिसतो. तिथवर पोहोचायचे असते. निसटून तिथवर पोहोचायचे असते. सोबत काहीबाही घ्यायचे असते. त्याची जुळवाजुळव सुरू असते. ती कधी पूर्ण होत नाही. त्यासाठी बळ पुरत नाही. समज पुरत नाही. मनाचा आकांत उडतो. निसटून चालल्याची जाणीव भयंकर असते. संध्याकाळ जाणीवेतून निसटून चालल्याची जाणीव फार भयंकर असते. सृजनाचा तथाकथित अहंकारच गळून पडतो. पडायलाच हवा. देहाची वाळू होऊन अशा वेळी अथांग समुद्रात समजूतदारपणे वाहून जावी हे योग्य. संध्येसोबत स्वतःही निसटावे हे योग्य. समुद्रात संध्याभय कुठून उरणार? समुद्रात अस्तित्वाचे पुर्वीचे संदर्भ तरी कुठे तेच उरणार? देहजाणीव तरी पुर्वीची तीच कुठे राहणार? शरीराला अशीच अंतिम मुक्तता हवी वाटते. मनाला नाही.

मनाला पार्थिव शरीरच हवे. त्याला शरीराची भूल पडलेली आहे. संध्याभय शरीराला वाटते. त्वचेला वाटते. नजरेला वाटते. मनाला नाही. त्याला सांजभयाचीही भूल पडलेली आहे. त्याला संध्याभयाचे देणे उमगते. त्याला ते स्वीकारावे हे कळते. सृजनाचा दुर्बोध क्षण कुठे रूजू घालावा हे त्याला नेमकेपणाने कळते. त्याच्या विवर्तातली लय फक्त शरीराला नेमकी उमगायला हवी. त्याच्या आकांतातला नेमका सूर फक्त शरीराला उमगायला हवा. संध्येचा हात पकडता येणे तेंव्हाच शक्य आहे.
संध्याकाळी शब्दांनी उजळणे फक्त तेंव्हाच शक्य आहे.

-१३-१०-२०१२.

No comments:

Post a Comment