दमट पावसाळी अंधार. अंधारात पसारा मांडून बसायचं. त्याच्या रंगरूपावर अंधार हळूहळू जमू द्यायचा. तुमच्या त्वचेवर हा जांभळा रंग जमू द्यायचा. तेंव्हाच मूड जुळला तर जुळेल. तुम्ही मुद्दामहून दुरूस्त करून घेतलेल्या रंगीत खिडक्यांतून पावसाळी सर्द हवा आत खोलीत येईल. तिने तुमच्याकडल्या जुनाट पुस्तकांची पानं फडफडतील. तेवढीच सजीव हालचाल. तुमच्या हाताशी नेमक्या सगळ्या वस्तू हव्यात. डोक्याशी लॅपटॉप, करंगळीशी कॅनॉन आणि भिजलेल्या पाठीखाली काफ्काच्या शॉर्ट स्टोरीज वगरे. त्याखाली सदैव टोचणारी चटई. ट्रायपॉड्वर तुमच्या चड्या वाळत घातलेल्या. छानपैकी फ्लॅश मारून त्याचा फोटो घ्या. मस्त येईल. रंगीत खिडक्या बॅग्राऊंडला.
भिंतीवर नवीनच लावलेला एन्लार्ज केलेला तुमच्या आवडत्या मैत्रीणीचा ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो तुम्ही बारक्या डोळ्यांनी बघता. या पावसाळी अंधारात त्यातले तपशील फिके झाल्यासारखे वाटतात. परकेपणा वाटतो. फोटो अगदीच संदर्भहीन वाटतो. अगदी इनएप्रॉप्रिएट वाटतो. अस्ताव्यस्त पडलेली पुस्तकंही कधीच न वाचल्यासारखी वाटतात. ब्रेथलेस मधल्या मिशेल सारखं अगदी बीट्रेड वाटतं.
-२२-१०-२०१२.
No comments:
Post a Comment