disable right click

Thursday, January 31, 2013

ब्रेथलेस पर्यंत गोदार फक्त आवडायचा. विव्रे सा विया नंतर तो भयानक आवडायला लागला. मी त्याच्या या दोन सिनेमांचा विचार करत आजकाल बहुदा दुपारचा घरी पडलेलो असतो. थंड लादीवर गादी टाकून वर पंख्यात परपेंडिक्युलर खिडक्यांची प्रतिबिंब न्याहाळत. रूममेट्स आपापल्या खोलीत झोपलेले असतात आणि माझ्या मनात प्रेयसीची आठवण वगरे चुकून कधीतरी चुटपुटत असते. ती सोडून गेल्यावर अजिबात भेटलेली नाही. तिच्या मनाबद्दल काही अंदाज करता येत नाही.

ब्रेथलेस मध्ये मिशेल मरतो आणि विव्रे सा विया मध्ये नाना. गोदार शेवटच्या दोन मिनिटांत दोघांचेही खून करवतो. ब्रेथलेस मध्ये पॅट्रीशिया त्याला फसवते आणि विव्रे मध्ये राओल नानाला. पण ब्रेथलेस तरीही मला पॅट्रीशिया साठी आवडतो आणि विव्रे सा विया नाना साठी. ब्रेथलेस मध्ये मिशेलला बीट्रेड वाटलं असेल आणि विव्रे मध्ये नानाला. पण त्यांना तेवढं वाटायलाही गोदार जिवंत ठेवत नाही. त्यामुळे पहिल्यांदा सिनेमा बघताना मी हादरलो. मग हळहळलो.

ब्रेथलेस मध्ये मिशेल मुळे पॅट्रीशियाला दिवस गेलेयत आणि हे ऐकून घ्यायची त्याची मुळीच तयारी नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल कधीच मला काही वाटलेलं नाही. त्याच्या मरण्याचं दुःख वगरे अजिबात कधी मला होत नाही. पण नानाचं मरणं खूप ऍब्रप्टली येतं. ती फार तर वीस सेकंदात मरते. अगदी ब्लॅक अँड व्हाईट इंस्टंट मरण. त्यापुढे विचार करायला माझ्याजवळ बराच अवकाश उरतो.
सबंध कोमट हिवाळी दुपार.

बऱ्याचदा हे नानाचं नाहीसं होणं आणि मिशेलच्या पाठी पॅट्रीशियाचं उरणंच मला माझ्या प्रेयसीच्या आठवणींपर्यंत घेऊन जातं. ही दोन्ही कॉंट्राडिक्शन्स मी खूप समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मी फार पडताळून पाहिलं पण मला बीट्रेड कधी वाटंत नाही. अगदी कमालीचं एकटं वाटंत असतानाही नाही. कुणावर दोष टाकावा असं वैतागाच्या शेवटच्या क्षणीही वाटंत नाही. जाताना तिनेही माझ्यावर कसला दोष टाकलेला नाही. नुसतं सुटसुटीत निघून जाणं. गोदार याच बिंदूवर कुठेतरी माझ्या समजूतीत घुसतो. नानाच्या जाण्याला कारणं नाहीत. तिचं मागे काही उरत नाही. मिशेल मरतो त्याचं पॅट्रीशियाला टोकाचं दुःख होत नाही. ती नुसतीच त्याच्याशिवाय फार काही न गमवता जगू शकते. आयडियली नोटिसेबल असं फार काहीच घडलेलं नाही. गोदार त्यांना एवढं ऍब्रप्टली का संपवून टाकतो ते इथे थोडंफार कळतं.

मग दोन्ही सिनेमे मी मिशेल का मेला आणि नाना का मेली त्याची निव्वळ पार्श्वभूमी म्हणून पाहिले.
मग तसेच पहायला लागलो.


-२९-११-२०११.

No comments:

Post a Comment