गडद काळ्या अंधारात जन्म. त्याआधीच्या जीन्याचे संदर्भ कालबाह्य. आपल्याच विस्मृतीत. चार आटोपशीर पावलं पुढे. मग उजवीकडे. त्यापुढे पॅसेज. प्रकाशाचे अतृप्त दिशाहीन पुंजके हवेत तरंगत. तिथून डावीकडचं दार. ते हळूच उघडून आत.
आत चार मुलं मुली गिटार घेऊन बसलेली. ए मायनर. तीन बोटं. इ ए डी जी बी इ. पुन्हा पुन्हा तेच. पॅसेजमधली शांतता दाराबाहेर तात्कळत. अनादी काळापासून. तुम्ही कुठले? आतले की बाहेरचे? एक सनातन प्रश्न मनात घेऊन उभे.
काचेच्या खिडक्यांतून शुभ्र प्रकाश अतोनात. ड्रम्सवर एक लहान मुलगा. कीबोर्डवर एक. प्रत्येक कोपयात सितार वीणा तंबोरा. व्हायोलीन घेऊन मधोमध एक मुलगी. गिटार धूळ खात ढीगाने पडलेली. एक मुलगी शांततेचं दार उघडून आत येते. सगळ्यांच्या नजरा उत्तेजित तिच्यावर. ती उत्सुक नी घाबरलेली.
तिचा पहिला दिवस.
गिटारवरच्या चारातल्या दोघांची बोटं दुखतात. मनगटं दुखतात. जो तो त्याला हवं तसं वाजवतो. मग त्याचा हळूहळू तालबद्ध केऑस. प्रत्येकजण. प्रत्येकजण अगदी स्वतंत्र. ए मायनर जी मायनर सी शार्प सी मेजर सगळं एक. एकात एक. ड्रम्सवरचा मुलगा केऑस तालात व्यवस्थित पकडतो. मुलगी स्वतंत्र. प्रकाशाला पाठमोरी. संगीताचा स्पर्श नसलेली. खरीखुरी व्हर्जीन. ती पायांत ताल पकडते. तिला पाहत राहावं. ती प्रकाशात विरघळते.
नवी मुलगी डावखुरी? हे ऐकून चार मुलं हसतात. चार मुली हसतात. गडद हसतात. कार्पेटवरची धूळ उडते. शिक्षक असलेला माणूस अवाक. त्याच्या भुवया तालात ताणल्या जातात. मुलगी उत्सुक. शिक्षक असलेल्या माणसाच्या बोटांना थरथर सुटते. तो म्हणतो डावीकडून उजवीकडे लिहीत जाणं सोप्पं आहे. तेच उजवीकडून डावीकडे लिहीत जाणं कठीण आहे. चार मुलं शांत. चार मुली शांत.
डावखुया माणसांसाठी बाजारात वेगळी गिटार्स मिळतात.
मुलगी हसत नाही. ती कुणाकडेच पाहत नाही. तिला म्युझिक रूममधला केऑस निव्वळ आवडतो. फक्त तेवढ्यासाठी शांततेचं प्रचंड दार उघडून ती आत येते. सगळं पहिल्यांदा घडंत असल्यासारखं दरवेळी घडतं. ती कोपयात प्रकाशाला पाठमोरी उभी राहते.
चार मुलं चार मुली ए मायनर वर.
-१-१-२०१३.
No comments:
Post a Comment