disable right click

Thursday, December 26, 2013

निळाईचा विपर्यास

समजून घेण्याची कुवत गमावून बसलोय की काय असं मधेच वाटतं. खूप तीव्रतेने वाटतं. शब्द, त्यांची वाक्यं, त्यांचे अर्थ आणि अर्थाचे विपर्यास यांचा कॅलीडोस्कॉप बघ बघून मन आताशा बरेचदा भिरभिरून जातं. नुसते नुसते नागडे शब्द पुरेशे असतात गोष्टी समजून घ्यायला? आणि आपण खरंच त्यांच्या अर्थावर विसंबणार असतो? त्या समजण्यापलीकडे काहीतरी अत्यंत महत्वाचं  उरतंच. त्याचं काय? निळाईचा विपर्यास.

मी पाठीमागची टेकडी चढून जातो. स्वतःतूनच निसटुन स्वतःकडे पाहण्यासारखी दुसरी गोष्ट नाही. वर जाऊन खाली पाहावं. सगळ्यांचे किरटे व्यवहार किरट्या जीवनेच्छा किरटी धावपळ. सहा वाजताची धांदल. हे बघण्यासारखं सेल्फिश सुख नाही. काही क्षणांपुरते मी या कॅलीडोस्कॉपला माझे थकलेले डोळे लावतो. शब्दांनी एखाद्यास्तोवर पोहोचणं तुलनेने सोपं आहे. त्यापलीकडे कसे पोहोचायचं?

दोन माणसं एकत्र बसून आपापले स्वतंत्र विचार करू शकतात. ती स्वतंत्र असू शकतात. या पोकळीत शब्द फुंकण्याची हिंमत कोण करणार. ती तिच्या प्रेरणेने माझ्यासोबत टेकडी चढून येते. थोडीफार का होईना पण माझ्यावर अवलंबून. स्वतःचा शहाणपणा सोबत घेऊनच. सगळं अर्ध्या तासाचं संचित. 

आमचे डोळे उसन्या दृश्यांवर खिळलेले. मी सहसा गवतावर निजतो. वरच्या निळाईत माझे डोळे सोडून देतो. अखंड सलग निळा रंग. जरा डोळ्यांचे कोन हलवले तर उजवीकडे बुडणारा सूर्य. डावीकडे फिकट चंद्रकोर. समोर पाय दुमडून बसून ती. तिच्या विचारांत. तिच्या मनातली चलबिचल माझ्यापर्यंत न पोहोचू देण्याची तिची कोवळी कसरत. हा निळा रंग माझ्या जाणीवेवर कोसळतो. डोळ्यांना कुठे सवय असते सलग एकसंध रंग पाहण्याची. निळ्या रंगाचं आंधळेपण येतं. मी डोळ्यांसमोर बोटं फिरवून तो क्षण खुडून टाकतो. ती मला फक्त बघते. तिच्या बदामी डोळ्यांतून. पुन्हा कधीतरी ती स्वतःहूनच माझ्या सोबत तिथे निजेल. विचारांतून, शब्दांतुन निसटून त्या निळाईत हरवून जाईल. इतक्या वर्षांचं जमवत आणलेलं कसकशाचं ओझं त्या निळ्या नदीत अलगद सोडून देईल. मी स्वतःलाच सांगतो.   


मग जाताना हळूच ती बोटांनी गवताच्या काड्या माझ्या राठ केसांतून खुडते आणि या सगळ्याला नाही म्हणायला, इतपतंच अर्थ. 


-२-१-२०१३.

1 comment: