disable right click

Monday, October 31, 2016

You ain’t goin’ nowhere

आपल्या सगळ्याच पोस्ट कधीपासून एकाच सूरात उमटत राहतात याचं काय आश्चर्य वाटायचं. तुमच्यासारखे जगणारे फ़क्त तुम्हीच नसता हे कळून चुकलं की मग ही बेफ़िकीरी येते.


मला एकदा असं जाणवलं की हे खरं आहे, की आपण सतत उत्तरं शोधत असतो. ती कधी मिळत नाहीत हेही खरं
आहे. म्हणजे मिळतात उत्तरं, पण समोर उभ्या राहत जाणाया प्रश्नांच्या संख्येपुढे त्या दहा-पाच उत्तरांचं कौतुक किरकोळही उरत नाही. तेव्हा मला वाटलं की निव्वळ प्रश्नच शोधत रहायचे. खूप खूप प्रश्न शोधायचे. डोकं
फुटेस्तोवर विचार करायला लागला तरी हरकत नाही. जितके जास्त प्रश्न तितका समजूतदारपणा वाढतो. पुस्तकांत शोधायचे. सिनेमांच्या अर्थात शोधायचे. गाण्यांच्या शब्दांत शोधायचे. माणसांच्या जगण्या-मरण्यात
शोधायचे. फ़ेसबूकवर शोधायचे. प्रश्न हा जगण्याचा बेस बनवायचा.


आणि काही ठाम मतं बनवून टाकायची, कितीही फालतू असली तरी. मग बिनमतलबी बोलणं टाळण्यासाठी तीच फेकायची बरळणायाच्या इगोवर. कुणी म्हटलंच, की मी विचार करतोय तर त्याला कडकडून मिठी मारायची.

Monday, February 8, 2016

ट्युरीन हॉर्स

ट्युरीन हॉर्सच्या मनात नेमकं काय होतं असेल? तो असा चालता चालता अचानक का थांबला असेल? बेल तार म्हणतो तसं, कुणाला त्या घोड्याबद्दल खरंच काय ठाऊके, आणि कुणी ते जाणून घ्यायचा खरंच प्रयत्न वगरे केलाय का एरव्ही?

मी माझं आयुष्य असं आलटून पालटून कुणाकुणाच्या दोऱ्यांवर अजूनही शेकायला टाकत असताना, मला ट्युरीन हॉर्सची आठवण का होत राहते?

...

फान होच्या कळण्यातलं थोडं तरी कळणं साधणारे का कधी कुणाला? त्याच्या आऊट देअर मधल्या पॅसेजच्या थंड भिंतीला पाठ टेकवून आणि अर्धा पाय दुमडून आपण कसली तरी वाट बघत उभे आहोत असं का वाटतं, किंवा त्याच्या लाईफ़ इन स्लमधल्या त्या नेमक्या क्षणाशी माझा काहीतरी संबंध आहेच आहे, असं का वाटंत? त्याच्या फोटोंत अक्षरशः अख्खं आयुष्य लपवायला जागा आहे. त्याचे सगळे ब्लॅक अँड व्हाईट फोटो मी माझ्या मनात विरळवून टाकलेयत. त्यांतल्या उन्हाचं मला प्रचंड आकर्षण आहे.

एक मोजकी माणसं सोडली तर बाकी कुठले संदर्भ आयुष्यभर तेच राहतात? आपलीच जाण बदलते, आपल्याच सवयी बदलतात, रुटीन बदलतं, कपड्यांचे म्हणता म्हणता शंभर सेट होतात- जुने कपडे कंटाळवाणे होतात. आपलं आयुष्य फार फार तर त्या चार दोन माणसांपुरतं स्थिर करता येत असेल, मग या बाकी सगळ्याचं काय? आणि हेच कळायचंय का शेवटी? की आपल्याला पैसाच्या खांबासारखं- असलोच तर- स्थिर, निश्चल असायचं आहे? फान होच्या फोटोतल्यासारखं? बाकी जग आणि त्यातली माणसं अनंत काळ आपल्याभोवती गरगरत राहिली तरी.


या एवढ्यासाठी कुठला नीत्शे माझ्या गळ्यात पडून रडणारे?

Sunday, January 31, 2016

सगळं


रात्रीच्या स्वप्नाचं जडत्व
दिवसाच्या खांद्यावर
आणि दिवसाचं ओझं
ठेवलंय आपण स्वप्नात तरंगत

या  सगळ्याचीच सिग्रेट वळून
तिच्या धुरात विचार करत बसू आपण

सगळ्याचा.

-३१-१-२०१६